Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर चीनचा पलटवार, अमेरिकेच्या शेअर बाजारत सलग दुसऱ्या दिवशी हाहाकार, 500 श्रीमंतांचे 17 लाख कोटी बुडाले

Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन आणि भारतासह विविध देशांवर टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर चीनकडून पलटवार करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेच्या शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण सुरु आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिलला पत्रकार परिषद घेत रेसिप्रोकल टॅरिफ चीन आणि भारतासह विविध देशांवर लादत असल्याचं जाहीर केलं. यानंतर चीननं देखील अमेरिकेवर पलटवार केला आहे. अमेरिकेतून येणाऱ्या वस्तूंवर 34 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा चीननं केली आहे. याशिवाय 11 कंपन्यांना बिनाभरवण्याचे उद्योग अशा यादीत टाकलं आहे. याद्वारे चीन या कंपन्यांना चीन किंवा चीनच्या कंपन्यांशी व्यवसाय करण्यापासून रोखत आहे.
चीननं पलटवार केल्यानं अमेरिकनं बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. डॉव जोन्स इंडस्ट्रीयल अवरेज निर्देशांक 1200 अंकांनी किंवा 3 टक्क्यांनी घसरला. एस अँड पी 500 निर्देशांक साडेतीन टक्क्यांनी घसरला आहे. नॅस्डॅक कंपोझिट 3.8 टक्क्यांनी घसरला आहे. नॅस्डॅक 16 डिसेंबर 2024 ला उच्चांकावर पोहोचला होता. तिथून 21 टक्के घसरला आहे.
अमेरिकन शेअर बाजारासाठी गुरुवारचा दिवस 2020 नंतरचा सर्वात खराब ठरला. एस अँड पी 500 निर्देशांक 4.85 टक्के म्हणजेच 5395.92 अंकांनी घसरुन बंद झाला. तर, नॅस्डॅक कंपोझिट 1053.60 अकांनी घसरुन 16547.45 अंकांवर बंद झाला. डॉव जोन्स इंडस्ट्रीयल अवरेज देखील 4 टक्क्यांनी घसरुन 40542.71 अकांवर बंद झाला. ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफ मुळं अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये मोठी घसरण झाली असल्यानं जगातील 500 सर्वात श्रीमंत व्यक्तींची संपत्ती 20.8 हचार कोटी डॉलर्स म्हणजे 17.73 लाख कोटींनी घटली.
अमेरिका आणि जगभरातील शेअर बाजारांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे कारण चीननं अमेरिकेवर टॅरिफ लादण्याचा घोषा केली आहे. याशिवाय कॅनडा देखील लवकरच अमेरिकेवर टॅरिफ लादेल.
चीनची निर्यातबंदी
अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर देण्यासाठी चीननं देखील आक्रमक भूमिका घेतली आहे.अमेरिकेला निर्यात केल्या जाणाऱ्या सात दुर्मिळ आणि हेवी मेटॅलिक एलिमेंटसच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय चीननं घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनात वापरल्या जाणाऱ्या काही गोष्टींचं उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया चीनमध्येच होते. त्यामुळं अमेरिकेला हा मोठा धक्का असणार आहे.
प्रामुख्यानं चीनच्या नव्या टॅरिफचा परिणाम डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफच्या तुलनेत कमी असेल. कारण चीनकडून खरेदी करण्याऐवजी त्यांना विक्री करतो. गेल्या वर्षी चीननं 147.8 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची आयात केली होती. यामध्ये अमेरिकेच्या सेमीकंडक्टर, जीवाश्म इंधन, कृषी उत्पादनं, इतर उत्पादनांचा त्यात समावेश होता. तर, अमेरिकेला 426.9 अब्ज डॉलर्सची विक्री केली होती. स्मार्ट फोन, फर्निचर, खेळणी यासह इतर गोष्टींची निर्यात केली होती.