भुसावळ येथे बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३९वे राज्य अधिवेशन भव्यदिव्य पार पडले

संघटित शक्ती द्वारे व्यवस्था परिवर्तन होईल -वामन मेश्राम
भुसावळ, ता. २४ ऑगस्ट (रिपब्लिक व्हॉइस इंडिया – अलीशा तांबोळी)
भुसावळ येथील शांतीनगर कमल गणपती हॉलमध्ये २४ ऑगस्ट २०२५ रोजी बामसेफ व राष्ट्रीय मूलनिवासी संघाचे ३९वे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या अधिवेशनाचे उद्घाटन लॉ. किशोर ढमाले यांच्या हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी वामन मेश्राम होते. यावेळी बोलताना किशोर ढमाले यांनी मनुवादी व्यवस्थेमुळे देशातील कामगार, कष्टकरी, शेतमजूर, महिला व विद्यार्थी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचले असल्याचे सांगितले. या अन्यायकारी व्यवस्थेविरोधात बामसेफ लढा देत असून समाजातील प्रत्येकाने त्यास सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात वामन मेश्राम म्हणाले की, ईव्हीएम मशीनच्या गैरवापरातून सत्तेवर आलेल्या आरएसएस प्रेरित भाजपा सरकारने एस.सी., एस.टी., एन.टी., व्ही.एन.टी., अल्पसंख्यांक व आदिवासींचे संविधानिक अधिकार हिरावून घेतले आहेत. या मनुवादी व्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी बहुजन समाजाने बूथ स्तरावर संघटित शक्ती उभी करणे आवश्यक आहे. संघटित शक्तीद्वारेच व्यवस्थेचे परिवर्तन शक्य होईल, असे ते म्हणाले.
या अधिवेशनाला शीख मोर्चाचे हरजीतसिंग खालसा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे प्रभारी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दीपक इंगळे, मौर्य क्रांती संघाचे चंद्रसेन लहाडे, प्रतापदादा पाटील, मायप्पा तुरई यांच्यासह बामसेफच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमासाठी झालेली गर्दी इतकी प्रचंड होती की सभागृह अपुरे पडले. भुसावळ बामसेफ युनिटने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले.