दलित वस्ती सुधार योजना आणि शेतरस्ता योजनेतील कोट्यवधींचा गैरव्यवहार; चौकशीची मागणी

ता. १४ जुलै (रिपब्लिक व्हॉइस ऑफ इंडिया), जिल्हा प्रतिनिधी, धाराशिव
जवळा (खुर्द), ता. कळंब, जि. धाराशिव येथे दलित वस्ती सुधार योजना आणि शेतरस्ता योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे.
२०१९-२० पासून २०२३-२४ या कालावधीत जवळा (खुर्द) गावात दलित वस्ती सुधार योजना आणि शेतरस्ता दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे ग्रामपंचायतीमार्फत हाती घेण्यात आली होती. या योजनेंतर्गत पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झोपडपट्टी ते गुळ कारखाना रस्ता, शहाजी कांबळे ते गंभीरे यांच्या घरापर्यंतचा रस्ता, पारधे वस्ती ते सटवाई रस्ता आणि गाव ते कळंब हिरा रस्ता या मार्गांवर मुरूम टाकून खोट्या बिलांद्वारे शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.जुन्याच रस्त्यावर मुरुम टाकून बिले उचलली गेली आहेत. ग्रामपंचायत ने शासनाची शुध्द फसवणूक केली असताना संबंधित अधिकाऱ्यांना याचे सोयरे सुतक का नाही? अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधी कडे तक्रारकर्त्यानी केली आहे.
दलित वस्तीत समाजमंदिरासाठी दरवाजे बसविण्याची तरतूद असतानाही ती पूर्णपणे अंमलात आणलेली नाही, तसेच सिमेंट रस्ते बांधताना अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले. परिणामी, सहा महिन्यांतच हे रस्ते उखडून खड्ड्यांनी भरले आहेत.
या सर्व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, यासाठी सामाजिक कार्यकर्ते बजरंग धावारे यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कळंब; मुख्य कार्यकारी अधिकारी, धाराशिव; आणि जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
धावारे यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात उपोषणाचा इशारा दिला आहे. स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्याशी संगनमत करून या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. उलट, धावारे यांना अरेरावीची व धमक्यांची भाषा वापरून त्रास दिला जात आहे.
त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे तक्रार अर्जाद्वारे स्पष्ट केले असून, जर लवकरच चौकशी सुरू झाली नाही, तर २१ जुलै रोजी मंत्रालय, मुंबई येथे आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. शासनाच्या आणि जनतेच्या पैशाचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी संबंधितांकडे केली आहे.