“शिक्षण वाचवा, शाळा वाचवा” विद्यार्थी रॅलीला पावसातही भरघोस प्रतिसाद

औरंगाबाद, 28 जुलै (रिपब्लिक व्हॉईस इंडिया – आलिशा तांबोळी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून जिल्हाधिकारी कार्यालय, संभाजीनगर (औरंगाबाद) येथे भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने “शाळा वाचवा, शिक्षण वाचवा” या घोषणेसह भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
देशभरात व महाराष्ट्रात आर.एस.एस.च्या प्रभावाखालील भाजपा सरकारद्वारे हजारो शाळा बंद करण्यात येत असून, यामुळे एससी, एसटी, एनटी, व्हीजेएनटी, ओबीसी, अल्पसंख्याक व आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गदा येत आहे. नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे मनुस्मृतीच्या तत्वांवर आधारित असून, त्यानुसार बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या धोरणाला विरोध दर्शवित महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या जनहित कायद्याला छेद देत, ओबीसी, आदिवासी, शेतकरी, कामगार, महिला यांचे संविधानिक अधिकार डावलले जात आहेत. एकीकडे धार्मिक कर्मकांडांसाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले जात आहे, तर दुसरीकडे सरकारी शाळा चालवण्यासाठी निधी नाही, असे कारण पुढे केले जात आहे.
या पार्श्वभूमीवर, भर पावसातही राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या प्रसंगी सिद्धांत मौर्य, प्रताप दादा पाटील, दीपक इंगळे आणि जितेंद्र भोसले यांनी उपस्थितांना संबोधित केले. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

