डॉ. चंद्रकांत कोलते यांना वाघोली येथे अभिवादन सभा – समाजकारणाला दिलेले योगदान स्मरणात

वाघोली, पुणे (दि. 31 ऑगस्ट 2025, जिल्हा प्रतिनिधी – रिपब्लिक व्हॉईस इंडिया, आलिशा तांबोळी)
वाघोली गावचे आदर्श व्यक्तिमत्त्व व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. चंद्रकांत कोलते यांना अभिवादन करण्यासाठी हवेली तालुक्यातील ओझोन विला सोसायटी येथे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कोलते यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे गायन करून वातावरण अधिक भावपूर्ण झाले. या प्रसंगी डॉ. कोलते यांचे कुटुंबीय, नातेवाईक, आप्तेष्ट तसेच साहित्यिक, धार्मिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गाथा परिवाराचे संस्थापक उल्हास पाटील, राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष सिताराम बाजारे, शिवले नाना, श्रीमंत तात्या झुरुंगे, रवींद्र कंद, उत्तम अण्णा भोंडवे, अण्णा मगर साहेब, सुनील आव्हाले, बाळासाहेब ढगे, वाळके आप्पा, बोईरकर आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यांच्या भाषणात डॉ. कोलते हे विज्ञानवादी विचारांचे, भ्रष्टाचार व दहशतवादाचा ठाम विरोध करणारे धाडसी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगण्यात आले. त्यांनी राजकीय जीवनात नैतिकता व नीतिमत्ता जपली. राष्ट्रीय जनहित परिषदेच्या स्थापनेपासूनच त्यांचा सक्रिय सहभाग होता. समाजकारणाला नेहमीच राजकारणापेक्षा प्राधान्य देत त्यांनी शेतकरी, कामगार व सर्वसामान्यांसाठी ज्वलंत प्रश्न उपस्थित केले. आरोग्य सेवेतून समाजसेवेला अधिक महत्त्व देत ग्रामीण भागातील लोकांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी केले.
उल्हास पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, डॉ. कोलते हे समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा, जातीय द्वेष आणि शेतकऱ्यांच्या समस्यांविरोधात नेहमी आवाज उठवत होते. त्यांना कधीच गर्व किंवा अहंकार नव्हता. कार्यक्रमात डॉ. कोलते यांच्या समाजहिताच्या कार्याची उजळणी करण्यात आली. त्यांच्या कार्याची परंपरा पुढे नेणे हेच त्यांना खरी श्रद्धांजली असल्याचे मान्यवरांनी स्पष्ट केले.
प्रा. डी बी धावारे यांनी आपल्या प्रस्ताविकेत डॉक्टर कोलते यांच्या मानवतेच्या अनेक आठवणी सांगितल्या आपल्या गहिवरून आलेल्या भाषणातून त्यांना अश्रू अनावर झाले होते सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून परिवर्तनवादी व प्रबोधनवादी विचारांची मांडणी करण्यासाठी हिरावरील पुरस्कार घेणारे हवेलीतील सुपुत्र काळाने ओढून नेला त्यांच्या जीवनकार्यांचे स्मरण येणाऱ्या पिढ्यांना राहण्यासाठी ग्रंथ रूपाने त्यांचा स्मृतिगंध छापण्याचे काम करावे असे आवाहन त्यांनी केले.
या स्मरणिका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र कंद यांनी केले. प्रफुल्ल कंद यांनी डॉ. कोलते यांच्या सुसंस्कृत राजकारण व समाजकारणाला उजाळा देत अभिवादन सभेची सांगता केली.